भोपाळ : भोपाळच्या वन विहार राष्ट्रीय उद्यानात आशियाई सिंहांची एक जोडी गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आली आहे, शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास नर-मादीची सिंह जोडी वनविहारमध्ये पोहोचली. या जोडीला 1,000 किमी अंतरावरून इथे आणण्यासाठी खास तयार केलेल्या वाहनाचा वापर करण्यात आला. नर आणि मादी दोन्ही तीन वर्षांचे आहेत. ही जोडी वनविहारमध्ये पोहोचताच अधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. वनविहारचे वन्यजीव डॉक्टर या जोडीच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत हे दोन सिंह वन विहार राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. वन विहारने सक्करबाग प्राणीसंग्रहालयाला वाघाची जोडी दिली आहे. या अंतर्गत मध्य प्रदेशात प्रथमच शुद्ध आशियाई सिंहाची जोडी आणण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सिंहाच्या या जोडीला मांस दिले. यासोबतच त्यांच्या आवारात रूम हिटरची व्यवस्था करण्यात आली असून त्याला पडदेही लावण्यात आले आहेत. त्यांनी नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे आणि कोणाशीही कमीत कमी संवाद साधावा, असा आमचा प्रयत्न आहे.