गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने महामानवाचा अपमान केला – उद्धव ठाकरे

0

मुंबई : भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीने उल्लेख केला यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अमित शहा आणि भाजपावर कडाडून टीका केली. महाराष्ट्रात जेव्हा कोश्यारी नावाचे एक गृहस्थ महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बसवले होते तेव्हा महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. त्यांच्या लग्नाच्या वयावरुन त्यांनी विचित्र टिप्पणी केली होती. छत्रपती शिवरायांचा अपमानाही कोश्यारींनी केला होता. त्यावेळी भाजपाने त्यांना माफी मागायला सांगितली नाही. त्यांना पदावरुन दूर केले नाही. मध्यंतरीच्या काळात छत्रपती शिवरायांचा पुतळा घाईने बसवण्यात आला, तो पुतळा आठ महिन्यांत पडला. त्यानंतर काय घडले सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्र गांडुळांचा प्रदेश आहे असे भाजपा नेत्यांना वाटत आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे. अशात कहर झाला. आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली त्या देशाच्या महामानवाचा अपमान केला. आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन झाली आहे असा हिणकस आणि उद्दाम उल्लेख अमित शहा यांनी केला. पंतप्रधान मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी नाहीतर सत्ता सोडावी अशी मागणी केली.

ते पुढे म्हणाले की, मला भाजपाला पाठींबा देणारे नितीश कुमार आहेत, चंद्राबाबू आहेत ते काय करत आहेत? हे विचारायचे आहे. रामदास आठवले काय करत आहेत? भाजपासह त्यांच्या मित्र पक्षांना बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता खुलासा करावा की, अमित शहांकडून हे वदवून घेतले आहे का? अदानीचे नाव घेतले की, आभाळ कोसळावे तसा भाजपा कोसळतो. रामदास आठवले, एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीश कुमार, चंद्राबाबू या सगळ्यांना हा अपमान मान्य आहे का? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्यांच्याबाबत अमित शहांसारख्या माणूस इतका तुच्छतेने कसा काय बोलू शकतो? याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी दिले पाहिजे. भाजपाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. घटनाकारांचा अपमान करणाऱ्यांना अभय देणार असतील, तर मोदींनी सत्तेवर राहू नये, मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी किंवा सत्ता सोडावी.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech