वर्षभरापूर्वी केलेल्या पूनम चेंबरच्या तक्रारींवर पालिकेचा कानाडोळा
मुंबई : वरळीतील पूनम चेंबरमध्ये लागलेल्या आगीच्या संदर्भात, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यापूर्वीच या ठिकाणच्या विविध नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षेच्या कमतरतेबाबत पालिका प्रशासनाला लेखी तक्रार करून माहिती दिली होती. मात्र, दुर्दैवाने प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. अनिल गलगली यांच्या मते पूनम चेंबर परिसरात नियम आणि सुरक्षेच्या नियमांना तिलांजली दिली गेली असून याबाबत तत्काळ कारवाई केल्यास भविष्यात अश्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.
अनिल गलगली यांच्या तक्रारींवर जी दक्षिण विभागाचे इमारत व कारखाने खात्यातील कार्यकारी अभियंता यांनी 21 जानेवारी 2024 रोजी काही मुद्द्यांवर शहर इमारत व प्रस्ताव खात्याचे कार्यकारी अभियंता यांस पत्र पाठवुन अभिप्राय मागविले. जेणेकरुन एकत्र अहवाल शहर विभागाचे अतिरिक्त आयुक्तांना यांस सादर केला जाईल. जर पालिकेने वेळेवर लक्ष घालून योग्य ती कारवाई केली असती, तर आज ही दुर्दैवी घटना टळू शकली असती आणि वित्तीय हानीदेखील टाळता आली असती. ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि नियमांकडे डोळेझाक करण्यामुळे झाल्याचे स्पष्ट होते.
मे. पुनम एन्ड पटेल कंस्ट्रक्शन लि. यांनी भूकर क्र. ९९५ क्षेत्र ३३४४.५० चौ.मी या क्षेत्राचा चटईक्षेत्र निर्देशांक क्र.१/३ या मिळकतीवर अनाधिकृतरित्या वापरला आहे. परंतु, सदर जागेचे संरक्षण करून त्यावर बगीचा विकसित करण्याच्या अटीच्या अधीन राहून भाडेपट्ट्याचा करारनामा केल्यानंतर चटईक्षेत्र निर्देशांक वापरणेबाबत परवानगी देण्यात आली होती. परंतु, त्यांनी करारनामा केला नाही, बगीचा विकसित केला नाही व जागेचे संरक्षणही केले नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेता, मे. पुनम एन्ड पटेल कंस्ट्रक्शन लि. यांचेकडून सदर जमीन सरकारजमा करण्यात यावी आणि शासकीय जमिनीवरील चटईक्षेत्र अनधिकृतरीत्या वापरल्याबद्दल त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन वापरलेल्या चटईक्षेत्राची प्रचलित बाजारमूल्य दर तक्त्यानुसार आकारणी करण्यात येऊन वसूल करण्यात यावी, असे पत्र कार्यासन अधिकारी मंजुषा सोनजे यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांस लिहिले आहे.