नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार करून महायुती सरकारने येत्या दोन दिवसांत खाते वाटप जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही खाते वाटपाचे काहीच ठरल्याचे दिसत नाही. मंत्रिमंडळात समावेश नसल्याने अनेक ज्येष्ठ नेते व आमदार नाराज आहेत. अजित पवार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ते दिल्लीला गेले असल्याचे सांगितले. खातेवाटपावरून ते नाराज आहेत. ते या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यानंतरच खातेवाटप जाहीर केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. यातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाला दांडी मारली आहे. दरम्यान, रविवारी संध्याकाळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या चहापानाच्या सरकारी कार्यक्रमालाही त्यांनी हजेरी लावली. परंतु त्यानंतर ते कुणालाही भेटलेले नाहीत.
मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून नाराजी असल्याने दोन्ही उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला गेले असल्याची चर्चा नागपुरात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्ही कोणीच नाराज नाही, सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा दावा केला होता. ज्या प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला अडीच वर्षे साथ दिली, त्याच प्रमाणे आपणही त्यांच्यासोबत भक्काम उभे राहणार असल्याचेही जाहीर केले होते. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा, नरेंद्र भोंडेकर यांच्यासह अनेक नेते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळाले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारही संपर्काबाहेर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालेले असतानाच पहिल्याच दिवशी अजितदादांनी दांडी मारली. त्यामुळे अजित पवार गेले तरी कुठे? असा सवाल विचारला जात आहे. बीड-परभणीतील संवेदनशील विषयावर सभागृहात चर्चा होत असताना दादा अनुपस्थित होते.
मुनगंटीवार 2 दिवसांपासून अधिवेशनात फिरकले नाही. तानाजी सावंतही रुसले आहेत. भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या उपनेतेपद आणि विदर्भाचे समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. अधिवेशनात उत्तर द्यायला संबंधित खात्याचे मंत्री नसताना आता दोन्ही उपमुख्यमंत्री कामकाजात उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकट्याने विरोधकांचा हल्ला परतवला.फडणवीस हे सुमारे तासभर विधानसभेत बसून होते. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री गेले कुठे, याचीच चर्चा सध्या विधिमंडळ परिसरात रंगली आहे. अजित पवार यांनी आपल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला. फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट करून फेरबदल केला जाईल, असे सांगितले. हे सर्व सोपस्कार पाडल्यानंतरही कोणाचीच नाराजी दूर झाल्याचे दिसत नाही, उलट वाढत चालली आहे. नाराज असलेले छगन भुजबळ अधिवेशनाला हजेरी लावून निघून गेले.