नागपूर : मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबर या दिवशी होणार आहे, अशी घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी 17 डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केला. त्यानुसार 19 डिसेंबर रोजी मतदान होईल. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
यासाठी 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले. यंदाच्या अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतीची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार आता ही निवडणूक होणार आहे. वास्तविक रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे; मात्र आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद भरले जाईल, अशी चर्चा चालू आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपकडे आहे, तर विधान परिषदेचे उपसभातीपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.