नागपूर : सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते होते आणि एकनाथ शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री होते, त्या वेळी त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करून त्यांना अडकवण्याचा कट रचला गेला, असे स्पष्ट करून भाजपचे गटनेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात पोलीस अधिकार्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लीप १७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सादर केली, तसेच या प्रकरणाची तात्काळ विशेष अन्वेषण पथकाच्या वतीने (एस्.आय.टी.) चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’वर बोलतांना केली. तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘एस्.आय.टी’द्वारे प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, एक कनिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीने हे करू शकत नाही. यामागे कुणीतरी सूत्रधार आहे. याचे उगमस्थान शोधायला हवे. हे प्रकरण रफादफा करण्यासारखे नाही. सत्तेचा दुरुपयोग करून जे लोकाभिमुख नेते आहेत त्यांच्यावर पोलीस विभागाला हाताशी धरून असा काही प्रयत्न झाला असेल, तर याविषयी सरकार अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून याविषयी वरिष्ठ आय.पी.एस्. अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एस्.आय.टी. गठीत केली जाईल. रेकॉर्डवर आलेली सर्व सूत्रे एस्.आय.टी चौकशीत घेतली जातील. निःपक्षपातीपणे सर्व गोष्टींचा समावेश करून तातडीने ‘एस्.आय.टी.’चा अहवाल प्राप्त करून त्यानुसार कारवाई केली जाईल.
तक्रारदार संजय पुनमिया यांचा २ सप्टेंबर २०२४ या दिवशी दिलेला जबाब दरेकर यांनी सभागृहात वाचून दाखवला आणि एसीपी सरदार पाटील यांच्या ऑडिओ क्लिपही सभागृहात सादर करून त्यावेळचे अधिवक्ता शेखर जगताप यांना शासनाने पॅनलवर दिलेले नसतांनाही ते न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करून एस्.आय.टी. नेमावी. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांची विभागीय किंवा ‘एस्.आय.टी.’द्वारे चौकशी करावी. अधिवक्ता शेखर जगताप यांच्यावरही गुन्हा नोंद झाला असून त्यांना शासकीय पॅनलवरून काढावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.
प्रवीण दरेकर म्हणाले की, विविध प्रकारच्या वृत्तवाहिन्यांवर १६ डिसेंबर या दिवशी ही गंभीर घटना राज्याच्या दृष्टीने दाखवली गेली. त्या संदर्भातील संभाषण, त्या ऑडिओ क्लिप आणि पेन ड्राइव्ह मी आणले आहे. संजय पांडे नावाच्या पोलीस अधिकार्याने पोलीस उपायुक्त (डीसीपी) लक्ष्मीकांत पाटील यांना ‘देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा. त्यांना अडकवण्याची योजना सिद्ध करा’, अशा प्रकारच्या संभाषणाची क्लिप संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. संजय पुनमिया यांनी शेखर जगताप, तेव्हाचे साहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सरदार पाटील आणि काही लोक यांच्या विरोधात जेव्हा तक्रार प्रविष्ट केली, त्यात जबाब जो दिला आहे, तो अत्यंत धक्कादायक आहे.