ठाणे : दुरुस्ती कामामुळे दिनांक १४ डिसेंबर ते दिनांक १५ डिसेंबर या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. यामुळे, रविवार १५ डिसेंबरपर्यंत, ठामपा क्षेत्रातील नौपाडा , पाचपाखाडी , बी – केबीन, महागीरी, कोपरी,आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिका नगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल.
दिनांक १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री ०१.०० वाजता पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्र १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे उदंचन केंद्र पिसे येथील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ पंप बंद झाले. त्यांच्या दुरुस्तीचे काम शनिवार, दिनांक १४ डिसेंबर व रविवार, १५ डिसेंबर रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे. या तातडीच्या कामामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे.