ठाणे : मुक्तछंद नाट्यसंस्था बालरंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे आणि प्रयोगशील उपक्रम करणारी नाट्यसंस्था म्हणून ओळखली जाते. ‘मुक्तछंद नाट्यसंस्था’ बालरंगभूमीवर एक आगळा-वेगळा आणि बालनाट्य विश्वात पहिल्यांदाच घडणारा नावीन्यपूर्ण बालनाट्य प्रयोग म्हणजेच म्हणींवर आधारित बालनाट्यांची शृंखला घेऊन आली आहे. या म्हणींवर आधारित बालनाट्य सादर करण्याच्या संकल्पनेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
म्हणी सांगतात कहाणी या धर्तीवर आधारित ‘मुक्तछंद नाट्यसंस्था डिसेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या एका वर्षात संदीप गचांडे लिखित म्हणींवर आधारित एकूण ११ बालनाट्य सादर केली आहेत. पेरावे तसे उगवते, करावे तसे भरावे, गर्वाचे घर खाली, एका माळेचे मणी, अळी मिळी गुपचिळी, अति तिथे माती, नाचता येईना अंगण वाकडे, थेंबे थेंबे तळे साचे, इकडे आड तिकडे विहीर, लहान तोंडी मोठा घास आणि दुरून डोंगर साजरे अशी सादर केलेल्या ११ बालनाट्याची नावे आहेत.
प्रत्येक ‘म्हण’ एक कहाणी सांगत असते आणि त्या कहाणीतून एक उपदेश म्हणा किंवा संदेश देत असते. आजच्या पिढीला म्हणींचे महत्व सांगून त्याची पुन्हा नव्याने ओळख पटवून देण्यासाठी तसेच त्यांना मराठी भाषेची गोडवी कळावी व ती लागावी या प्रांजळ उद्देशाने ‘मुक्तछंद नाट्यसंस्था’ म्हणींवर आधारित बालनाट्याची शृंखला (Series) सादर करीत आहे. मुक्तछंद नाट्यसंस्था अभिनय कार्यशाळा ठाणे, परळ आणि काळाचौकी शाखेतील शिबिरार्थ्यांनी बालक-पालक व प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात सदरचे प्रयोग सादर केले. म्हणींवर आधारित बालनाट्य सादर करण्याची शृंखला मुक्तछंद नाट्यसंस्था इथून पुढेही अशीच अविरत सुरु ठेवणार आहे, असे मत संस्थेचे संस्थापक व लेखक संदीप गचांडे यांनी व्यक्त केले आहे.