मुंबई : काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता ‘स्त्री २’ फेम अभिनेता मुश्ताक खानच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे. एका कार्यक्रमासाठी मेरठला जात असताना मुश्ताक खान यांचे अपहरण करण्यात आले होते. ही घटना २० नोव्हेंबर रोजी घडली होती. अभिनेते मुश्ताक खानचे बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मुश्ताक खान २० नोव्हेंबरला एका इव्हेंटसाठी मेरठला चालले होते. दिल्ली एअरपोर्टवरुन एक गाडी त्यांना मेरठला घेऊन जाणार होती. वृत्तानुसार, त्या गाडीने मुश्ताक यांना घेतले पण त्यांना मेरठला नेण्याऐवजी ते बिजनौरच्या दिशेने वळले आणि तेथे त्यांना १२ तास डांबून ठेवण्यात आले.
अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खान यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. पण अभिनेता त्यांना तेवढी रक्कम देऊ शकले नाहीत.म्हणून मुश्ताक खान यांच्या मुलांनी २ लाख रुपये अपहरणकर्त्यांना ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील बिजनौर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती शिवम यांनी दिली आहे. सध्या मुश्ताक खान ठीक असून या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. मेरठला होणाऱ्या या इव्हेंटसाठी मुश्ताक खान यांना अॅडव्हानसमध्ये पैसे देण्यात आले होते. त्यांना विमानाचे तिकीटही देण्यात आले होते. पण, दिल्ली एअरपोर्टला पोहोचल्यानंतर मुश्ताक खान यांच्याबरोबर हा प्रकार घडला, अशी माहिती त्यांचे बिजनेस पार्टनर शिवम यादव यांनी दिली आहे. त्यांच्याकडे विमानाचे तिकीट, एअरपोर्टचं सीसीटीव्ही फुटेज, याशिवाय बँक ट्रान्सफरचे डिटेल्सही आहेत.