डोंबिवली : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर वक्फ बोर्डाची मालकी असल्याचे मजलीस या संघटनेकडून वारंवार सांगण्यात येत होते. हा दावा फेटाळून लावण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि हिंदू मंच सारख्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी तब्बल ४८ वर्षे अथक संघर्ष केला. अखेर कोर्टाने हा दावा फेटाळून लावत दुर्गाडी किल्ला हे दुर्गामातेचे मंदिरच असल्यावर शिक्कामोर्तब केले असे प्रतिपादन आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले. याविषयी माहिती देण्यासाठी मंगळवारी डोंबिवली जिमखाना येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, हिंदू मंचाचे दिनेश देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे पराग तेली, सुरेंद्र भालेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान आमदार चव्हाण म्हणाले, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे, दिनेश देशमुख, सुरेंद्र भालेकर, पराग तेली, गोपाळ लांडगे यांच्या अथक प्रयत्नांना लाभलेले हे यश आहे. महाराष्ट्र शासन, सरकारी वकील, हिंदू संघटना आणि हिंदू मंचाच्या वतीने १९७६ पासून सातत्याने करण्यात आलेल्या अथक संघर्षाचे हे फळ आहे. यामुळे प्रत्येक हिंदू मनाला अपार आनंद झाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायालयाचे तमाम हिंदू बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो. दुर्गाडी किल्ल्याच्या मुक्तीसाठी मिळालेला हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विश्वासाचा विजय आहे.
तर देशमुख म्हणाले, आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याला तब्बल ५० वर्षे कायद्याच्या कचाट्यातून मुक्तता मिळाली आहे. १० डिसेंबर २०२४ रोजी न्यायालयाने दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनांकडून धार्मिक वापरासाठी दाखल करण्यात आलेला दावा फेटाळून हा किल्ला छत्रपतींच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या तमाम हिंदू बांधवांचा असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.