मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली असून यावेळी दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यात सत्तेत आल्यास धारावीतील अदानी समुहाचा पुनर्विकास प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे दिली जातील, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान आज झालेल्या भेटीत अदानी आणि फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. गौतम अदानी महायुती सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले असल्याचे सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीने भाजप आणि अदानी संबंधांचा मुद्दा उचलून धरला होता. विशेषतः मुंबईतील धारावी येथील जमीन अदानी यांना देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.