राहुल गांधींचे नेतृत्व इंडीया आघाडीला नकोय

0

मुंबई- शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज रात्री बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकी आधीच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी टिकास्त्र सोडले आहे. राहुल गांधींचे नेतृत्व यांना इंडिया आघाडीला नकोय. या संधीचा फायदा साधून संधीसाधू असणारे नेते आता ममता बॅनर्जीना पुढे आणण्याचा प्रयत्न करताहेत. युपीए अस्ताव्यस्त झालीय. कुणाचेही नेतृत्व आणले तरी यूपीए तग धरेल असे वाटत नाही. राहुल गांधींना बाजूला करण्यासाठी हा पराभव संधी म्हणून पाहताना दिसताहेत, अशी टीका दरेकर यांनी पवारांचे नाव न घेता केली.

मारकडवाडी येथे आज ईव्हीएम समर्थनार्थ भाजपा नेत्यांची सभा पार पडली त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मारकडवाडीतील जनतेचा, मतदारांचा तो आक्रोशच नाही. पवारांच्या किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या नावावर ईव्हीएम संदर्भात उभे केलेले नाटक आहे. ते नाटक पूर्णपणे फेल गेलेय. आज आमचे आमदार, धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर, शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत मारकडवाडीला गेले त्यावेळी गावातील मंडळी उपस्थित होती. झालेल्या निवडणुकीला आव्हान देऊन संविधानाचा, लोकशाहीचा अपमान तेथील ग्रामस्थ करू इच्छित नाही हे स्पष्ट झालेय. ईव्हीएमवर खापर फोडण्याचा विरोधकांचा जो प्रयत्न होता तो सपशेल फेल गेला असून ते तोंडघशी पडलेले आहेत.

तसेच राम सातपुते यांनी केलेल्या विधानावर दरेकर यांनी बोलताना स्पष्ट केले की, सातपुते यांच्या शब्दामागची शब्दशः भावना न घेता त्या मागचा त्यांचा राग समजून घ्या. खोट्या प्रकारची नाटकं करून, जनतेला लुटून सहकाराच्या माध्यमातून जो काही उन्माद यांनी मांडलाय त्यातून उदवेगातून आलेली ती प्रतिक्रिया असल्याचे दरेकर म्हणाले.

उत्तम जानकर यांनी केलेल्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले की, जानकर यांनी पहिली आपली आमदारकी टिकवावी. त्यांच्या प्रमाणपत्राचा इश्यू आहे याची त्यांना जाणीव नसावी. त्यांनी बोगस प्रमाणपत्र दिल्याची कोर्टात केस आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांनी पहिली आपली आमदारकी टिकवावी. त्यांच्या डोक्यात आता नेतेगिरीचे भूत गेलेय. त्यामुळे ते दुसऱ्यांना आमदारक्या वाटायला निघालेत. ते एवढी वर्ष स्वतः आमदार होऊ शकले नाहीत. आता ईव्हीएमद्वारे ते आमदार झालेत. ज्याच्यावर त्यांचा विश्वास नाही. त्यांनाही वाटत नव्हते निवडून येऊ मात्र ईव्हीएमवर निवडून आणलेय असे त्यांच्या वागण्यातून समजतेय. आपली क्षमता बघून लोकांना आश्वासन द्यावे. ज्याच्या हातातच काही नाही तो दुसऱ्याला काय देणार, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीवर बोलताना दरेकर म्हणाले की, पराभवाचा एवढा धक्का त्यांना बसला आहे की रोज चर्चा त्यांच्या सुरू आहेत. आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ते प्रयत्न अजिबात यशस्वी होणार नाहीत. लोकांना त्यांची नौटंकी समजून आलीय. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर बोलताना दरेकर म्हणाले की, अशा प्रकारच्या कुठल्याही तारखेची मला कल्पना नाही. तारीख हे राज्याचे मुख्यमंत्री, महायुतीचे दोन मिळून ठरवतील. ज्या तारखेला केंद्रातील शीर्षस्थ नेतृत्व मान्यता देईल त्यानुसार पुढची कार्यवाही होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech