भारतीय सैनिकांचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी – राज्यपाल

0

मुंबई : भारतीय सैनिक सीमेवर अतुलनीय शौर्य गाजवीत असतात. त्यांच्या शौर्याचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवणे आवश्यक असून युवा पिढीला तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीर चक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला. विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी कारगिल युद्धाच्या प्रसंगी आपण संसद सदस्य होतो, त्यावेळी पंतप्रधान वाजपेयी यांना भारतीय सैनिकांवर संपूर्ण विश्वास होता याची आठवण सांगितली. कॅप्टन यादव यांनी ग्रेनेडियर म्हणून बजावलेल्या पराक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. जीवनात शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही. एनसीसी पासूनच तरुण वयात शिस्तीचे धडे शिकायला मिळतात. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एनसीसीच्या बळकटीकरणावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कॅप्टन यादव यांनी यावेळी कारगिल युद्धप्रसंगाचा घटनाक्रम सांगून उपस्थितांच्या डोळ्यासमोर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे चित्र उभे केले. कॅप्टन यादव यांच्या लग्नाचा देखील २५ वा वाढदिवस असल्याने राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या पत्नी रीना यादव यांचा यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे ओटी भरून विशेष सन्मान करण्यात आला. जीवनसाथीच्या पाठबळाशिवाय कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही असे सांगून राज्यपालांनी संस्कृती जपल्याने ऋणानुबंध वाढतात, असे यावेळी नमूद करून दोघांना शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech