शास्त्रीनगर येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

0
  • ज्येष्ठ नेते हणमंत जगदाळे यांचे कारवाईसाठी प्रभाग समितीमध्ये ठिय्या आंदोलन  
  • अधिकाऱ्यांना धरले धारेवर, रहिवाशांची प्रभाग समितीमध्ये घोषणाबाजी

ठाणे : शास्त्रीनगर नं. 1 मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव येथील जागांवर मंजूर झालेला आहे. तशी वर्कऑर्डर निघाली आहे. मात्र पालिका आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करुनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त करत आज वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसह ठिय्या आंदोलन केले.

शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केले आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे. तर हत्तीपूल कडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे. या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरु करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागा बळकावल्या आहेत. आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झाला आहे.

आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रारी करुनही कारवाई केलेली नाही. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्वाच्या आहेत. मात्र वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे अनधिकृत बांधकाम सुरुच असल्याचा आरोप यावेळी हणमंत जगदाळे यांनी केला. तसेच जोवर अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे हणमंत जगदाळे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech