कोपरी मलप्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू न करताच ठेकेदाराच्या खिशात २ कोटींची खिरापत

0

(टीम ठाणेकर)

ठाणे – चेन्नई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोपरी येथे मलप्रक्रिया केंद्र सुरू करून त्याद्वारे वापरायोग्य पाणी आणि बायो गॅसद्वारे वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीने प्रकाशझोतात आला आहे. गेल्या तीन वर्षांत कामाची एकही विट लागली नसताना कंत्राटदाराला दोन कोटी रुपये अदा करण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केला आहे. आमदार संजय केळकर यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर याबाबत थेट आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

ठाणे शहरातील आठहून अधिक भागांतून वाहून आणलेले मलयुक्त पाणी कोपरीत प्रक्रिया करून ते खाडीत सोडून दिले जात होते. मात्र हे पाणी शुद्ध करून ते वापरायोग्य करणे, पुढील काळात त्या पाण्याची विक्री करणे आणि वीज निर्मिती करणे असा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर सुरू करण्यासाठी मे. व्ही. व्ही. टेक वाबाग लिमिटेड या कंपनीला तीन वर्षांपूर्वी कार्यादेश देण्यात आला होता. नवी मुंबईत ही संकल्पना यशस्वी झाल्याने ठाण्यात मलजल प्रक्रियेबाबत ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या तीन वर्षांत यापैकी एकही काम पूर्ण झाले नसताना, विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्तांची मंजुरी नसताना आणि कंत्राटदारांनी वेळोवेळी केलेल्या अंतर्गत बदलांना मान्यता नसताना अधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपये अदा केल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणली. श्री. केळकर यांनी शनिवारी कोपरी येथे या प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांच्या उघड-उघड भ्रष्टाचाराबाबत संताप व्यक्त केला.

याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की हा धडधडीत भ्रष्टाचार असून ठेकेदाराने काम न करता अधिकाऱ्यांनी ठाणेकरांच्या खिशातून दोन कोटी रुपये दिले आहेत. अधिकारी बेछूटपणे महापालिकेची लूट करत असून त्यांच्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही. या प्रकरणी तत्काळ चौकशी सुरु करण्यात यावी. यात कोणाचे हात गुंतलेले आहेत, हे देखील त्या निमित्ताने पुढे येईल. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही श्री. केळकर यांनी यावेळी केली.

प्रकल्पात अनियमितता

निविदा प्रक्रिया झाल्यानंतर प्रकल्पासाठी मे. व्ही. ए. टेक वाबाग लि. या कंपनीने मे.ग्रेडियंट इंडिया प्रा. लि. यांच्या सोबतीने मे.कोपरी बायो इंजिनिअरिंग प्रा. लि. नावाने विशेष कामासाठी फर्म बनवून या फर्मसोबत करारनामा करण्यात आला. दरम्यान हे करताना सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली नाही.

या प्रकल्पाचा ठराव व्ही.ए.टेक वाबाग लि. या कंपनीच्या नावे मंजूर असताना कोपरी बायो इंजिनिअरिंग प्रा. लि. नावाने देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सप्टेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीचे आठ कोटी ४४ लाख ५७,८९९ रुपयांचे देयक सादर करण्यात आले आहे. हे देयक ए. के. इलेक्ट्रिकल्समार्फत सादर करण्यात आलेले आहे. मे. कोपरी बायो इंजिनिअरिंग प्रा. लि. आणि ए.के.इलेक्ट्रिकल्स यांचा संबंध काय? मंजूर निविदाकार मे. व्ही.ए.टेक वाबाग लि. आणि मे.ग्रेडियंट इंडिया प्रा. लि. यांचा संबंध काय? ही बाब महापालिकेची दिशाभूल करणारी आहे. विशेष म्हणजे सादर केलेले देयक योग्य असल्याचा दाखला जोडण्यात आलेला नसून त्यास त्रयस्थ लेखा परीक्षण किंवा सल्लागार यांचा अभिप्राय जोडण्यात आलेला नाही.

ठेकेदाराने कार्यादेश दिल्यापासून २४ महिन्यांत प्रकल्पाची अंमलबजावणी करावयाची होती. या काळात सहा महिन्यांत प्रकल्पासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेणे आणि उर्वरित महिन्यांत प्रकल्प बांधून कार्यान्वित करणे अशी जबाबदारी असताना ३० महिने उलटूनही एकाही कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. ही बाब गंभीर असून निविदा अटी शर्थीस धरून नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech