विधानसभा अध्यक्षपदी अॅड. राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

0

अनंत नलावडे
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची बहूमताने सोमवारी निवड करण्यात आल्याने अॅड. नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष पदावर विराजमान होणारे दुसरे अध्यक्ष आहेत.यापूर्वी दिवंगत त्र्यबंक उर्फ बाळासाहेब भारदे यांनी सलग १९६२ व १९६९ असे सलग दोन वेळा म्हणजेच तब्बल दहा वर्ष विधानसभा अध्यक्षपद भूषवले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाजूकडूनही अॅड. नार्वेकर यांच्यावर यावेळी बोलताना स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आला.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरु झाले. सुरुवातीला हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ७ नवंनिर्वाचित सदस्यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून देत, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा प्रस्ताव पुकारला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राहूल नार्वेकर यांच्या नावासाठी अध्यक्षपदाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रस्तावाला अनिल पाटील, तरं शिंदे यांच्या प्रस्तावाला आशिष शेलार आणि पवार यांच्या चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी प्रस्ताव मतास टाकला. त्यामुळे सर्व सदस्यांनी हात उंचावून एकमताने नार्वेकर यांना अध्यक्ष म्हणून घोषित केले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार आणि विरोधी पक्षाकडून नाना पटोले, जंयत पाटील यांनी अॅड. नार्वेकर यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले. त्याचवेळी सत्ताधारी आमदारांकडून भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकच जयघोष करण्यात आला.

कारण या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर राज्यात २०२२ मध्ये सत्तांतर झाले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर विधानसभा अध्यक्षपदी याच अॅड. नार्वेकर यांची भाजपने निवड केली होती. आता २०२४ च्या निवडणुकीत राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर महायुतीतर्फे पुन्हा नार्वेकर यांचीच अध्यक्षपदी निवड करण्याचे निश्चित झाले.आणि आज अॅड. नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविणारे ते दुसरे अध्यक्ष ठरले.

गेल्या अडीच वर्षातील विधानसभागृह आणि विधानसभेबाहेरील वातावरण आणि शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांतील अंतर्गत संत्तासंघर्षांत सर्वेच्च न्यायालयाने त्यांच्यावर लवादाची जबाबदारी सोपविली असताना, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर अनेकदा दबाव टाकण्यात आला.अगदी पातळी सोडून टीकाही केली.मात्र कायद्याचे पदवीधर असल्याने विधिमंडळाच्या नियमांचे पालन करत, विरोधकांच्या टीका-टिप्पणीमुळे जराही विचलित न होता त्यांनी रामशास्त्री बाण्याने निर्णय दिला.त्याही निर्णयावर विरोधकांकडून टीका झाली.मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.आणि आता तर विधानसभेची निवडणूक तत्कालीन अध्यक्ष अॅड. नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला जनतेच्या न्यायालयानेही समर्थन दिले आहे. अॅड. नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांचा निवड झाल्यानंतर सत्तधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षाकडूनही मनात कोणताही किंतु न ठेवता त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. त्याचबरोबर अध्यक्षांच्या उजव्या बाजूप्रमाणे डाव्या बाजूच्या (विरोधी) सदस्यांनाही ते मागील टर्मप्रमाणे न्याय देतील अशी अपेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या सहीत सर्वच विरोधी सदस्यांनी व्यक्त केल्या.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सभागृहाचे आभार मानताना नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनीही कोणावरही अन्याय होऊ न देता समतोल न्याय देण्याची ग्वाही देतानाच चौदाव्या विधानसभेत अनेक महत्त्वाची कामे करण्याची संधी मिळाल्याने याचा उपयोग पुढील कार्यकाळात होईल अशी भावना व्यक्त केली.आपण सर्वजण राज्यातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आलो आहोत. सत्ताधारी आणि विरोधक असलो तरी राज्यातील तेरा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांचा आवाज कमी होणार नाही. दोघांनाही समानसंधी देण्यात येईल, अशी ठाम ग्वाहीही अॅड. नार्वेकर यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech